विनम्र आवाहन...

"प्रिय साहित्यरसिकहो, ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी आपणा सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादामुळे मला लाभते आहे. या अध्यक्षीय कालावधीमध्ये मराठी भाषा, संस्कृतीचे रक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टीने विविध संकल्पना, उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. आपणा सर्वांच्या सहभाग व सहकार्यातूनच हे कार्य पुढे जाऊ शकते. यासाठी, आपल्या मनात काही कल्पना असतील, त्या जरुर कळवाव्यात. विधायक, वेगळ्या आणि विषयाशी सुसंगत अशा उपक्रमांचा जरुर विचार केला जाईल. साहित्यबाह्य अथवा हेतूविसंगत, अप्रस्तुत सूचनांचा विचार करता येणार नाही. संमेलनाध्यक्ष हे मानाचे पद असले तरी सर्वांच्या सहभागातून त्यास कार्याची जोड देता येऊ शकते आणि मायमराठीसाठी दिशादर्शी आणि भरीव असे काही त्यातून नक्कीच करु शकू, याची मला खात्री आहे. आपणास सूचना खालील ई-मेल वर पाठविता येतील."

आपला स्नेहांकित,
लक्ष्मीकांत देशमुख
ई-मेल - laxmikant05@yahoo.co.in

संग्रह

#
#
#
#
#

मान्यवरांचे अभिप्राय...

"एक लेखक म्हणून मी हे जग बदलू शकणार नाही, पण बदलणारे जग कसे असायला हवे यासाठी भूमिका घेणा-यामधला मी एक निश्चितच आहे’ असे जे एका थोर विचारवंताने म्हणले आहे, तीच लक्ष्मीकांत देशमुखांची वाङ्‌मयीन भूमिका आहे."

- प्रा. अविनाश सप्रे

"श्री लक्ष्मीकांत देशमुख हे समकालीन वास्तवाचा ताकदीने वेध घेणारे आजचे मराठीतले एक महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी जे आजवर मराठी साहित्याला अपरिचित असणारे अनुभव विश्व साकारले आहे, ते त्यांच्या साहित्य विषयक भूमिकेतून व सामाजिक भानातून आले आहे."

- डॉ. रणधीर शिंदे, समीक्षक

"किंमत देऊन 'आतला आवाज' ऐकणाच्या व्यक्ती नेहमीच अल्प असतात, पण त्यांचे असणे, त्यांच्या कृती, त्यांचे प्रसंगी आलेले अपयशही प्रेरक असते, असे देशमुखांच्या वाङ्‌मयाचे महत्त्वाचे आशय सूत्र आहे."

- प्रा. अविनाश सप्रे

"जीवनातील व्यर्थतेमधला अर्थ शोधणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे आणि तीच त्याच्या माणूसपणाची खूण आहे. हीच त्याच्या माणूस असण्याची कसोटी असते. देशमुखांच्या साहित्यातील व्यक्तीरेखा या माणुसपणाच्या कसोटीवर उतरतात. त्यांची स्वतंत्र शैली असून त्यांचे सर्व साहित्य वाचनीय व चिंतनगर्भ आहे."

- डॉ. सुनिलकुमार लवटे

"भाषा आणि निवेदनाच्या अंगाने देशमुखांच्या कादंब-यांचा विचार करताना त्यांचे एक वेगळेपण लक्षात येते, ते म्हणजे त्यांची भाषा आणि सांस्कृतिक तपशिलावर असेलेली पकड. हिंदू व मुस्लिम धर्म परंपरा, चालीरिती तसेच त्यांचे भाषिक भानही वाखाणण्याजोगे आहे."

- डॉ. महेंद्र कदम

"अंधेरनगरी’ मधली नगरपालिका ही एक प्रकारे देशाच्या लोकशाही प्रयोगाचा छोट्याशा पडद्यावरचा क्लोजअप आहे. अतिशय वस्तुनिष्ठ दृष्टीने राजकीय - सामाजिक वास्तव रेखाटण्याच्या कादंबऱ्या मराठीत तशा कमीच आहेत, त्यात देशमुखांची ही कादंबरी खूपच आशा निर्माण करणारी आहे"

- डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर